संग्रामपूर, दि. ३० (प्रतिनिधी):
तालुक्यात बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या विशेष तपासणीत विविध त्रुटी आढळून आल्याने सात मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सहायक आयुक्त गजानन घिरके यांच्या नेतृत्वाखाली २७ मार्च २०२६ रोजी संग्रामपूर, वरवट बकाल आणि वानखेड परिसरातील औषध विक्री केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ मेडिकल दुकानांची पाहणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान काही मेडिकल दुकानांमध्ये औषध विक्रीची बिले उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तसेच औषध विक्रीसंदर्भातील विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत सात मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले.
संग्रामपूर येथील पशूसेवा मेडिकल, जनता मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स, महाराष्ट्र मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स, श्री रामदेवबाबा मेडिकल, श्री सद्गुरु मेडिकल, तसेच वानखेड येथील मदनलाल दामोधरदास पालीवाल मेडिकल आणि श्री मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स यांचा समावेश आहे.
दरम्यान, तपासणीमध्ये झोपेच्या गोळ्या, गर्भपातासाठी वापरले जाणारे एमटीपी किट्स किंवा गुंगी आणणारी औषधे आढळून आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय उर्वरित पाच औषध विक्री केंद्रांकडून आढळलेल्या त्रुटींविषयी स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून विना फार्मासिस्ट मेडिकल चालवू नये तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे
Users Today : 39