लोणार
लोणार परिसरात सर्पदंशाच्या घटनेत १९ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साक्षी रवींद्र सानप (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिलच्या रात्री साक्षी ही आई-वडिलांसमवेत घरात झोपलेली असताना तिला विषारी सापाने चावा घेतला. सकाळी उठल्यानंतर तिच्या घशात वेदना होत असल्याची तसेच अॅसिडिटीसारखा त्रास जाणवत असल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, संबंधित साप शेजाऱ्याच्या अंगणात आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसी द्वितीय वर्षाची अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
Users Today : 3