दाभा
लोणार तालुक्यातील जाफराबाद, दाभा, हिरडव व गुंधा शिवारात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतचोरी करत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. अवघ्या एका महिन्यात दुसऱ्यांदा तुषार संचाच्या पितळी तोट्या, मोटार आणि केबल चोरीस गेल्याने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
४ एप्रिलच्या पहाटे ही घटना उघडकीस आली. जाफराबाद येथील पोलीस पाटील रमेश ओव्हर यांची हिरडव-जाफराबाद मार्गालगत शेती असून, त्यांच्या शेतासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तुषार संचाद्वारे सिंचन व्यवस्था उभारलेली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील सुमारे ३३५ पितळी नॉझल तोट्या, टेक्समो कंपनीची ५ एचपी मोटार तसेच अंदाजे ३०० फूट केबल लंपास केली.
या शिवारात यापूर्वीही अशाच प्रकारची चोरी घडली होती. मात्र, त्या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा दुसऱ्यांदा चोरी झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.
या चोरीत पांडुरंग ओव्हर, भगवान राजगुरू, राम राजगुरू, विश्वास ओव्हर, कडूजी मोरे, अरुण ओव्हर, वैभव ओव्हर, पांडुरंग मोरे, प्रकाश मोरे, ओम मोरे, विजय घायाळ, रमेश मोरे, विठ्ठल मोरे, अंकुश ओव्हर, संजय पुरी, दशरथ पुरी, ज्ञानेश्वर तपासे तसेच दाभा येथील शेतकरी पांडुरंग मोरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच नापिकी, वाढता शेतीखर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या चोरीमुळे दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.
नवीन तुषार संच, मोटार आणि केबल खरेदीसाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ग्रामीण भागात वाढत्या शेतचोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी शिवारात पोलीस गस्त वाढवावी, चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा आणि शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
एकाच महिन्यात दुसऱ्यांदा घडलेली ही चोरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
Users Today : 3