मलकापूर बसस्थानक टवाळखोरांचा अड्डा की प्रवाशांचा आधार? महिला व विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात; प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मलकापूर बसस्थानक हे प्रवाशांसाठी सुरक्षित व सुसज्ज केंद्र असावे, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात ते टवाळखोरांचा अड्डा बनत चालल्याची गंभीर बाब समोर येत आहे. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे स्थानक आता असुरक्षित ठिकाण ठरत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात टपोरी तरुणांचे गट किंवा एकटे-दुकटे तरुण सर्रास वावरताना दिसत आहेत. महिलांवर अश्लील शेरेबाजी करणे, शिट्ट्या मारणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे तसेच संशयास्पद नजरेने पाहणे असे प्रकार उघडपणे सुरू आहेत. शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची कुचंबणा अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.

काही प्रकरणांमध्ये विना क्रमांकाच्या दुचाकींवरून येणारे तरुण तोंडाला रुमाल बांधून महिलांचा पाठलाग करत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. बसस्थानकावर पोलीस चौकी असतानाही प्रत्यक्षात पोलीस उपस्थिती अत्यल्प असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे टवाळखोरांचे धाडस वाढत असून ‘खाकी’चा धाक उरलेला नसल्याचे चित्र दिसत आहे.

सायंकाळच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनते. त्यातच व्यसनाधीन तरुणांचा वावर आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “बसची वाट पाहणेही आता धोक्याचे झाले आहे.” अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या असतानाही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. पोलिसांकडून केवळ तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला जातो, मात्र प्रत्यक्ष कारवाईचा अभाव जाणवतो.

या पार्श्वभूमीवर एखादी गंभीर घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बसस्थानक परिसरात तातडीने दामिनी पथकाची नियुक्ती, साध्या वेशातील पोलिसांची गस्त, तसेच संशयित वाहनांची तपासणी करणे अत्यावश्यक ठरत आहे.

मलकापूर बसस्थानक ‘भयमुक्त’ करण्यासाठी केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस आणि कठोर कृतीची गरज असून, अन्यथा सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

0 9 7 1 4 7
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *