बुलढाणा –
मागील वर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा आधीच तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी १० एप्रिलपासूनच ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक सत्रासाठी अकरावी प्रवेश महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारीच्या सूचना जारी करण्यात आल्या असून विद्यार्थी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरावा लागणार आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधील प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहे. मे महिन्यात प्रत्यक्ष नोंदणी, पसंतीक्रम भरणे, तसेच अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
ऑनलाइन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, क्रिमीलिअर प्रमाणपत्र यांसह सुमारे १२ आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादीही पोर्टलवरच जाहीर करण्यात येणार आहे.
पूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रिया जूनपासून सुरू होऊन ऑगस्टपर्यंत चालत असे. मात्र, नव्या पद्धतीमुळे या प्रक्रियेला कालमर्यादा निश्चित करण्यात येत असून अनावश्यक विलंब टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रवेशाचे टप्पे
ऑनलाइन नोंदणी, फॉर्म भरणे, महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे, अर्ज पडताळणी, गुणवत्ता यादी, प्रवेश न मिळाल्यास पुढील फेरी, तसेच एटीकेटी सुविधा असे विविध टप्पे या प्रक्रियेत असतील.
समांतर आरक्षणानुसार प्रवेश
नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना यूजर आयडी व पासवर्ड मोबाइल आणि ई-मेलवर प्राप्त होणार आहे. दहावी परीक्षेचा क्रमांक टाकताच संबंधित माहिती पोर्टलवर दिसणार आहे. प्रवेश प्रक्रियेत राखीव जागांसह समांतर आरक्षणाचा निकष लागू केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देण्याची मुभा राहील. ग्रामीण व शहरी भागातील विविध महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वेगवेगळी असल्याने त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत केंद्रीय प्रवेश फेरी, संस्थात्मक कोटा, व्यवस्थापन कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यांचाही समावेश असणार आहे.
शिक्षण विभागाने वेळेत नियोजन करून प्रक्रिया सुरू केल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेत गोंधळ टळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Users Today : 21