मेहकरमध्ये १६ मेपासून घरगणना; नागरिकांनी घरबसल्या स्वगणना करावी – मुख्याधिकारी रामराजे कापरे

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर

भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत मेहकर शहरात १६ मे २०२६ पासून घरगणना टप्प्यास सुरुवात होणार असून नागरिकांनी घरबसल्या स्वगणना करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले आहे.

जनगणना प्रक्रिया यंदा डिजिटल स्वरूपात दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा म्हणजे घरांची गणना असून तो १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. दुसरा टप्पा प्रत्यक्ष जनगणनेचा असून तो फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे.

या प्रक्रियेपूर्वी नागरिकांसाठी स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांनी *se.census.gov.in* या संकेतस्थळावर जाऊन स्वगणना (Self Enumeration) करावी. यामध्ये नागरिकांनी आपल्या घराचे जीओ लोकेशन निवडून ३४ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो.

स्वगणनेदरम्यान घराची माहिती जसे की, फरशी व भिंतीचे साहित्य, खोल्यांची संख्या, शौचालयाची उपलब्धता, घराची मालकी तसेच कुटुंबातील सदस्यांची संख्या आदी तपशील विचारण्यात येणार आहेत. माहिती भरल्यानंतर नागरिकांना एक *SE ID* मिळणार असून तो जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटीवर येणार असून त्या वेळी नागरिकांनी आपली अचूक माहिती तसेच SE ID सादर करणे अपेक्षित आहे.

जनगणनेचा मुख्य उद्देश अचूक सांख्यिकी माहितीच्या आधारे विविध शासकीय कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविणे हा असून नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जनगणना २०२७ ची प्रक्रिया जलद व यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वगणना करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले आहे.

0 9 6 8 3 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *