मलकापूर
मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे महावितरणच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका कुटुंबाच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशाल इंगळे यांच्या घरावरून अत्यंत धोकादायक पद्धतीने वीज वाहिनी गेली असून ती इतकी खाली झुकलेली आहे की कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, सदर वीज तार घराच्या अगदी जवळून जात असून पावसाळा किंवा जोरदार वाऱ्याच्या वेळी ती घराला स्पर्श होण्याची शक्यता आहे. यामुळे कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक वायरमनने कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोप विशाल इंगळे यांनी केला आहे. “कामाच्या व्यस्ततेचे कारण” सांगत अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते करण विनोद इनके यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की, “घरावरून गेलेली वीज वाहिनी कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात घडवू शकते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे.”
दरम्यान, संबंधित वीज तार तातडीने सुरक्षित अंतरावर हलवावी, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
Users Today : 22