नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशभरात ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी, निराशा आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकरणानंतर देशातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पेपरफुटी प्रकरणात मुख्य सूत्रधारासह काही आरोपींना अटक करण्यात आली असून, केंद्रीय तपास यंत्रणांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने NEET परीक्षेची नवी तारीख जाहीर केली असून, आता २१ जून २०२६ रोजी देशभरात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.
मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचल्याचे चित्र समोर येत आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर परिसरात NEET परीक्षा दिलेल्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थिनीला परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा होती; मात्र परीक्षा रद्द झाल्याचा तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
तसेच राजस्थानमधील सिकर येथे २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने यापूर्वी दोन वेळा NEET परीक्षा दिली होती आणि यंदा यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे तो नैराश्यात गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय गोव्यातील एका १८ वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, या सलग घटनांमुळे देशभरात चिंता व्यक्त होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा परीक्षा, वाढता ताण आणि भविष्यासंदर्भातील असुरक्षितता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक दडपण वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक आधार देण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Users Today : 25