नवी सांगवी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड परिसरातील नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तब्बल १५,४७८ उमेदवारांनी नोंदणी केली असून १२० पेक्षा अधिक कंपन्यांनी थेट मुलाखती घेतल्या.
या प्रक्रियेतून ७ हजारांहून अधिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “आजच्या काळात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. २०४७ चा विकसित भारत हा युवाशक्ती आणि त्यांच्या कौशल्यावरच उभा राहणार आहे.”
कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपायुक्त अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सु.रा. वराडे, पक्षनेते प्रशांत शितोळे आणि स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत पार पडले.
आमदार जगताप यांनी सांगितले की, पुणे हे शहर आता जागतिक स्तरावर ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून विकसित होत असून रोजगार व उद्योग वाढीसाठी राज्य सरकारच्या विविध योजनांचा मोठा फायदा होत आहे. गेल्या ११ वर्षांपासून असे रोजगार मेळावे आयोजित करून युवकांना संधी दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपायुक्त अनुपमा पवार यांनी तरुणांनी संयम, कौशल्य आणि सातत्याने मेहनत करून करिअर घडवावे, असा संदेश दिला. तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोकरी मिळवण्याबरोबरच ती टिकवणे आणि स्वतःला सिद्ध करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
या मेळाव्यामुळे परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या दिशेने मोठी चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Users Today : 32