नाशिक
आदिवासी विकास विभागामार्फत होणाऱ्या गट-‘ड’ चौकीदार पदभरती प्रक्रियेवरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असून, परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने आदिवासी विद्यार्थी महासंघ आक्रमक झाला आहे. या प्रकरणामुळे नाशिकमधून राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या चौकीदार भरतीसाठी ४५४ पदांवर तब्बल ७४ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र परीक्षा प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत आदिवासी विद्यार्थी महासंघाने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयात माहिती अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज दाखल केला आहे.
या अर्जामध्ये परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे नाव, निविदा प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न यासंबंधी माहिती मागविण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी विद्यार्थी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सोनिताभ पवार यांनी सांगितले की, “जर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिक असेल, तर परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर करण्यास सरकार का घाबरत आहे? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सहन केला जाणार नाही. मागितलेली सर्व माहिती आणि परीक्षेचा पॅटर्न सार्वजनिक करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.”
तर विद्यार्थी नेते विनोद राठोड यांनीही प्रशासनावर टीका करत परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा पूर्वइतिहास, कार्यपद्धती आणि परीक्षेची पारदर्शकता विद्यार्थ्यांसमोर आणणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. “जर माहिती तातडीने जाहीर झाली नाही, तर विद्यार्थ्यांचा रोष वाढेल आणि आंदोलन तीव्र होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सुरू असून भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता आदिवासी विकास विभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.
Users Today : 30