चिखली
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घर गणना’ (Houselisting) आणि घरांची यादी तयार करण्याच्या मोहिमेला चिखली तालुक्यात आजपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. ही मोहीम १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा चार्ज अधिकारी (ग्रामीण) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
तालुक्यात ३८६ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स
जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका प्रशासनाने व्यापक तयारी केली असून संपूर्ण तालुक्याचे ३८६ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्समध्ये विभाजन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी ३६४ प्रगणक आणि ६१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रामुख्याने शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले हे कर्मचारी प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत.
डिजिटल पद्धतीने जनगणना
यंदाच्या जनगणनेत पारंपरिक कागदी प्रक्रियेऐवजी मोबाईल ॲप आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे माहिती अधिक सुरक्षित, जलद आणि अचूक स्वरूपात संकलित होणार आहे.
याशिवाय नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या कुटुंबांनी ऑनलाइन माध्यमातून स्व-गणना पूर्ण केली आहे, त्यांनी प्रगणक घरभेटीदरम्यान आपला SE ID देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा माहिती भरण्याची गरज भासणार नाही.
अचूक माहिती देणे नागरिकांचे कर्तव्य
जनगणना कायदा १९४८ अंतर्गत प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना खरी, अचूक आणि संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर कर आकारणी किंवा इतर चौकशीसाठी केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जाणीवपूर्वक चुकीची माहिती देणे किंवा माहिती देण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा मानला जाऊ शकतो आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे – तहसीलदार
चार्ज अधिकारी तथा तहसीलदारांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “प्रगणक घरी आल्यानंतर त्यांची ओळख पटवून त्यांना संपूर्ण व अचूक माहिती द्यावी. तसेच ज्यांनी स्व-गणना केली आहे त्यांनी SE ID नोंदवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”
जनगणना ही भविष्यातील लोककल्याणकारी योजनांचा पाया ठरणारी प्रक्रिया असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Users Today : 30