मुंबई
Apmc मधून एक मोठी बातमी समोर येत आहे.ACB च्या नवी मुंबई युनिटने मुंबई Apmc प्रशासनात मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे APMC प्रशासकीय इमारतीत एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ACB पथकाने सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. ACBच्या पथकाने मुंबई APMC प्रशासकीय इमारतीतील स्वच्छता उप सचिव कार्यालयावर धाड टाकत रोख रकमांनी भरलेली बॅग हस्तगत केली.
या प्रकरणात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी तसेच स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छता कंत्राटदाराच्या प्रलंबित बिलाच्या मोबदल्यात १५ टक्के कमिशनची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ACBने दोघांनाही रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर APMC प्रशासनातील विविध विभागांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
