देशभरात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे भारतातील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. याबाबत पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. “अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं भारतामधील ट्विटर अकाउंट सस्पेंड झालं आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका वक्तव्यात देशातील तरुणाईची तुलना “झुरळांशी” केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वक्तव्याच्या निषेधार्थ अभिजित दिपके यांनी “कॉक्रोच जनता पार्टी” या नावाने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. अल्पावधीतच या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पार्टीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली.
अवघ्या काही दिवसांत या पार्टीने सोशल मीडियावर मोठा प्रभाव निर्माण केला. इन्स्टाग्रामवर सुमारे 10.5 मिलियन फॉलोअर्स तर ट्विटरवर जवळपास 1 लाख 60 हजार फॉलोअर्सपर्यंत या अकाउंटची पोहोच वाढली होती. मात्र आता ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
“धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी” हे या पक्षाचे घोषवाक्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये या पार्टीबाबत मोठी उत्सुकता आणि प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पुढील वाटचालीबाबत बोलताना अभिजित दिपके यांनी सांगितले की, “अजून काही ठरवलेले नाही. आमच्या पार्टीचे फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत. आधी सर्वांच्या समस्या जाणून घेणार, प्रश्न समजून घेणार आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू.”
सध्या सोशल मीडियावर या पक्षाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर या चर्चेला आणखी वेग आला आहे.
Users Today : 32