मुंबई
रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. नोंदणी प्रक्रिया, तपासणी आणि आस्थापनांचे नियमन ही सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून एका महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.
नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रत्यक्ष बैठकीस कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
### स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यावर भर
कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी स्पष्ट केले की, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आस्थापनांची नोंदणी आणि खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणे ही मंडळाची मुख्य जबाबदारी आहे. ही सर्व कामे नियमित आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आस्थापनांवर योग्य नियंत्रण ठेवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
### रायगडमधील युवकांना रोजगाराची संधी
सध्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५० सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगडमधील स्थानिक युवक रोजगार संधींपासून वंचित राहत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.
मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर सध्या २,५३१ सुरक्षा रक्षक नोंदणीकृत असून, त्यांची नियुक्ती झाल्यास मोठ्या प्रमाणावर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा अभिप्रायही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
### संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णयाचे निर्देश
ठाणे आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देशही मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.
*स्थानिक बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून, सुरक्षा रक्षक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Users Today : 32