चंद्रपूर प्रतिनिधी :
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिसरात वाघाच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या काही दिवसांत तब्बल १३ महिलांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
माहितीनुसार, जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने अचानक हल्ला चढविला. या सलग घटनांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांमध्ये कन्नाबाई दराजी मेश्राम, अनूबाई दराजी मेश्राम, सुनीता कोसरे मेश्राम आणि संगीताबाई सांबय चांदरे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, वाघाचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये वाघांच्या हालचाली वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, एकट्याने जंगलात न जाणे, समूहाने फिरणे आणि वनअधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
Users Today : 44