“शेतकऱ्याला जोडधंद्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे माझे वेड असून, मतदारसंघात श्वेत क्रांती घडविणे हे माझे स्वप्न आहे,” अशी भावना व्यक्त करत एका लोकप्रतिनिधींनी शेतकरी विकासासाठी दुग्ध व्यवसायाच्या महत्त्वावर भर दिला.
सन 2014 मध्ये कळपिरा येथे शेतकरी बांधवांना शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी दिलेल्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम आज गावात स्पष्टपणे दिसून येत आहे.
अलीकडेच सुनिल तांगडे, रवी इंगळे, सुभाषराव तांगडे आणि शुभम तांगडे या शेतकरी कुटुंबांच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांनी उभा केलेला यशस्वी दूध व्यवसाय पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. कळपिरा गावात आज आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक कुटुंबांना त्यातून आर्थिक स्थैर्य मिळत आहे.
“शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर सक्षम होताना पाहणे, यापेक्षा मोठा आनंद नाही,” असे मत व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाशी आपली नाळ कायम जोडलेली असल्याचे सांगितले. स्वतः शेतकरी कुटुंबातून आले असल्यामुळे शेतीतील अडचणी, कष्ट आणि आर्थिक संघर्ष जवळून अनुभवले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतीसोबत जोड व्यवसाय वाढवून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, हा आपला कायम प्रयत्न राहिला असून, मतदारसंघात दुग्ध व्यवसायाचा विस्तार करून श्वेत क्रांती घडवून आणण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कळपिरा येथील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रवास हा योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि आधुनिक दृष्टिकोन यांच्या बळावर शेतकरी कोणतीही उंची गाठू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
“प्रत्येक शेतकरी बांधवाशी माझी नाळ जोडलेली आहे आणि त्यांच्या हितासाठी माझे कार्य असेच सातत्याने सुरू राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Users Today : 44