खामगाव : शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी ठरणारा ‘भोईराज आर्ट अँड क्राफ्ट आनंद मेळा’ लवकरच स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर भरविण्यात येणार आहे. या मेळ्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध आकर्षक खेळ व मनोरंजनाची साधने उपलब्ध असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५ दिवसांनंतर या आनंद मेळ्याला सुरुवात होणार असून तयारीला वेग आला आहे. गेल्या सात दिवसांपासून मैदानावर विविध खेळ व स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे.
या मेळ्यात आकाशी पाळणा, ब्रेक डान्स, सलाम्बो, ड्रॅगन ट्रेन, टोरा-टोरा आणि नाव झुला यांसारखे थरारक खेळ नागरिकांचे आकर्षण ठरणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, वॉटर शिप, वॉटर रोलर, मिकी माऊस आणि जंपिंगसारख्या विशेष खेळण्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आनंद मेळा नागरिकांच्या उत्साहाचे केंद्र ठरण्याची शक्यता असून कुटुंबासह मोठ्या संख्येने नागरिक भेट देणार असल्याचे चित्र आहे.
