वरखेड : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीकडून तातडीने देण्यात यावी, तसेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी गुरुदेव भक्त आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या मागण्यांसंदर्भात तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास येत्या ५ जूनपासून तिवसा तहसील कार्यालय परिसरात शेकडो गुरुदेव भक्त व शेतकऱ्यांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी दिला आहे.
मागील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचा पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्चही निघाला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही हतबल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आपल्या उभ्या सोयाबीन पिकांवर ट्रॅक्टर फिरवल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
अशा गंभीर परिस्थितीतही विमा कंपन्यांकडून केवळ प्रतिएकर २०० ते ३०० रुपयांचा तुटपुंजा परतावा देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची उघडपणे थट्टा आणि अहवेलना सुरू असताना शासन गप्प का?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५६० शेतकऱ्यांनी सुमारे ८.९० कोटी रुपये भरून पीक विमा उतरविला होता. याशिवाय राज्य शासनाकडून २.१२ कोटी आणि केंद्र शासनाकडून २.१२ कोटी रुपयांचा प्रीमियम जमा करण्यात आला होता. अशा प्रकारे शेतकऱ्यांसह एकूण १३.१४ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झाला होता.
मात्र, संपूर्ण पीक हातचे गेल्यानंतरही जिल्ह्यातील केवळ ९ हजार ३४२ शेतकऱ्यांना सुमारे १.५० कोटी रुपयांचा अत्यल्प विमा परतावा मंजूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासन आणि विमा कंपनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद बा. पुनसे, माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर, दीपक देशमुख, निवृत्ती मुकद्दम, विलास हांडे, राहुल लवनकर, बालकृष्ण शिरपूरकर, आशिष ढोरे, अंकुश बोके, संजय पुनसे, पंकज कळंबे, नामदेवराव तांबे, किशोर गोरडे, विजेंद्र शिरपूरकर, प्रशांत पुनसे, रवी जवंजाळ, सुधीर लवणकर, भैय्या पिंगळे, शंकर ढोक, अमोल डाखोरे आदी शेतकरी व गुरुदेव भक्त उपस्थित होते.
