तिवसा : तिवसा परिसरात सध्या भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला असून शेतशिवारात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काढणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भुईमूग पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
यंदा मौजा विंचोरी येथील शेतकरी दादाराव घोरमाडे यांनी उमेश उमप यांच्या शेतात लागवडीने भुईमूगाची शेती केली. या पिकासाठी केवळ बियाण्यावरच सुमारे १८ हजार रुपयांचा खर्च आला. त्यानंतर फवारणीसाठी ५ हजार, खतांसाठी ६ हजार आणि काढणीसाठी जवळपास २० हजार रुपये खर्च करावे लागले. याशिवाय शेत तयार करणे व इतर पूरक खर्चही मोठ्या प्रमाणात झाला.
उत्पादनाच्या दृष्टीने पाहता, ५ बॅग बियाण्यांमधून सुमारे ८ क्विंटल भुईमूगाचे उत्पन्न मिळत आहे. सध्या बाजारात भुईमूगाला अंदाजे ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असला तरी वाढत्या खर्चाच्या तुलनेत हा भाव परवडणारा नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
पूर्वी तळेगाव ठाकूर परिसरात मोठ्या प्रमाणावर भुईमूग लागवड केली जात होती. मात्र वाढलेला खर्च, मजुरांची कमतरता, वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे या पिकाखालील क्षेत्र हळूहळू घटत चालले आहे.
दरम्यान, काढणीच्या काळात मजूर वर्गालाही प्रचंड कष्ट सहन करावे लागत आहेत. ४५ ते ४६ अंश सेल्सिअस तापमानात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत भुईमूग उपटणे आणि शेंगा तोडण्याचे काम करावे लागत आहे. अनेकदा मजुरांसोबत त्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलेही या कामात सहभागी होताना दिसतात.
“भुईमूग पिकात खर्च खूप वाढला आहे, पण त्यानुसार बाजारभाव मिळत नाही. मजूर मिळणे अवघड झाले आहे आणि वन्य प्राण्यांमुळेही नुकसान होते. एवढ्या कष्टानंतरही हातात फारसा नफा राहत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भुईमूग लागवडीपासून दूर जात आहेत,” अशी प्रतिक्रिया शेतकरी दादाराव घोरमाडे यांनी व्यक्त केली.
