अमरावती : घरफोडी करून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या राजापेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आवळल्या आहेत. शैलेश जनार्दन जोग यांच्या घरी २२ मे रोजी पहाटे झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तीन महिला आरोपींसह एका पुरुष साथीदाराला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडून आणखी तीन गुन्ह्यांची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी शैलेश जनार्दन जोग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांच्या आईने आवाज देऊन त्यांना उठवले. घराचा दरवाजा उघडून पाहिले असता काही महिला व पुरुष कटल्यामध्ये साहित्य घेऊन जाताना दिसले. कटल्यातील साहित्य तपासले असता त्यात घरातील इमर्जन्सी बॅटरी, इलेक्ट्रिक वायर आणि लोखंडी पाईप असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तत्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान नसीन शहा रमेश भोसले (वय १९), सुशीला आवेश भोसले (वय २०) आणि संकीता अंगेश भोसले (वय २०), सर्व रा. नेहरू मैदान, अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचा साथीदार मुलचंद सुतलवद पवार (वय ३२), रा. तहसील जवळ, राजकमल चौक यालाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून एक बॅटरी, इलेक्ट्रिक वायर, लोखंडी पाईप, तीन चाकी कटला रिक्षा, अॅल्युमिनियम गंज, स्टीलचे धामे, बर्नरची शेगडी, तसेच एचपी कंपनीचे सिलेंडर असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खाताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, पोउपनि मिलिंद हिवरे, पोउपनि रोशन चटे, पोहेका मनीष करपे, पंकज खटे, रवि लिखितकर आणि पोका अर्जुन कदम यांच्या पथकाने केली.
Users Today : 30