खामगाव : तालुक्यातील दिवठाणा येथे बंद करण्यात आलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी रि. का. से. जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खामगाव आगार व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२१ मे रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यानंतर दिवठाणा येथील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिवठाणा व परिसरातील विद्यार्थ्यांना टायपिंग, कॉम्प्युटर, ग्रंथालय, शिकवणी वर्ग तसेच इतर शैक्षणिक कामांसाठी खामगाव येथे ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
याशिवाय नागरिकांनाही विविध शासकीय कार्यालयीन व इतर कामांसाठी खामगावला जावे लागत असल्याने बस सेवा बंद झाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सकाळी ६ वाजता, सकाळी १०.३० वाजता, दुपारी १२ वाजता, सायंकाळी ४.३० वाजता तसेच रात्री ९ वाजता नियमित एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर रि. का. से. जिल्हाध्यक्ष नितीन वाघ, तालुकाध्यक्ष गौतम हेलोडे, तालुका संघटक शालिग्राम हेलोडे तसेच अशोक हेलोडे आणि अभय हेलोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 30