बुलढाणा :
एकेकाळी घर म्हणजे सुरक्षितता, विश्वास आणि भावनिक आधाराचे प्रतीक मानले जात होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या सलग कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी ही संकल्पनाच हादरून गेली आहे. आज गुन्हे रस्त्यांपेक्षा घराच्या चार भिंतीआड अधिक घडताना दिसत असून संशय, व्यसनाधीनता, आर्थिक ताण, मानसिक अस्थिरता आणि संवादाचा अभाव यामुळे अनेक कुटुंबांचे रूपांतर संघर्षाच्या आणि काही वेळा मृत्यूच्या घटनास्थळात होत असल्याचे भयावह वास्तव समोर येत आहे.
मेहकर तालुक्यात पत्नीशी झालेल्या वादातून पित्याने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकल्याची घटना, चिखली तालुक्यात दारूच्या नशेत मुलाने आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार, तसेच जळगाव जामोद परिसरातील ऑनर किलिंगची किनार असलेल्या घटनांनी जिल्ह्याच्या समाजमनावर खोल जखमा उमटवल्या आहेत. अलीकडेच राजुरा धरण परिसरात पित्याने चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याच्या घटनेने तर “घरच सर्वाधिक असुरक्षित ठिकाण बनत चालले आहे का?” हा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
हिंसेमागील प्रमुख कारणे
तज्ज्ञांच्या मते, कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमागे अनेक सामाजिक व मानसिक कारणे आहेत. त्यामध्ये दारू व इतर व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतला जाणारा संशय, आर्थिक ताण, बेरोजगारी, जमीन व मालमत्तेचे वाद, मानसिक तणाव, संवादाचा अभाव आणि कौटुंबिक कलहाकडे होणारे दुर्लक्ष ही कारणे ठळकपणे समोर येत आहेत.
विशेषतः ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेक कुटुंबांमध्ये तणाव वाढत जातो आणि त्याचे रूपांतर हिंसक घटनांमध्ये होत असल्याचे चित्र दिसत आहे.
आत्महत्यांमागे कौटुंबिक तणावाचे सावट
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या २०२४ च्या आकडेवारीनुसार, देशातील आत्महत्यांमागे ‘कौटुंबिक समस्या’ हे सर्वात मोठे कारण ठरत आहे. देशातील सुमारे ३३.५ टक्के आत्महत्यांमध्ये कौटुंबिक तणाव कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. व्यसन, आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि वैवाहिक तणावामुळे घरांमधील संवाद पूर्णपणे तुटत चालल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या अलीकडील घटनांनी हे वास्तव अधिक गडद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बहुतांश कुटुंबे बाहेरून सामान्य आणि सुखी दिसत होती; मात्र चार भिंतीआड अपमान, तणाव, संताप आणि नैराश्याचा ज्वालामुखी धुमसत होता.
‘घरगुती बाब’ म्हणून दुर्लक्ष धोकादायक
अनेकदा कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणाव याकडे समाज ‘घरगुती बाब’ म्हणून दुर्लक्ष करतो. मात्र वेळेत संवाद, समुपदेशन किंवा सामाजिक हस्तक्षेप न झाल्यास हा तणाव थेट हिंसेच्या टोकाला पोहोचत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आज प्रश्न केवळ वाढत्या गुन्ह्यांचा नाही; तर तुटत चाललेल्या नात्यांचा, हरवत चाललेल्या भावनिक आधाराचा आणि असुरक्षित होत चाललेल्या घरांचा आहे. वाढत्या कौटुंबिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि कौटुंबिक संवाद याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याची गरज अधिक तीव्रतेने व्यक्त होत आहे.
Users Today : 46