लग्नसराई व उन्हाळी सुट्ट्यांमुळे एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी

KHOZ MASTER
3 Min Read

राखीव आसनांवर पुरुष प्रवासी बसत असल्याने महिलांची गैरसोय

बुलढाणा :

लग्नसराईचा हंगाम, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वाढती प्रवासी संख्या यामुळे जिल्ह्यातील एसटी बससेवांवर ताण वाढला असून सध्या बसेसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारांतून धावणाऱ्या बसेसमध्ये दररोज प्रवाशांची झुंबड उडत असून अनेक मार्गांवर बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने अनेक फेऱ्यांमध्ये बस क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. काही ठिकाणी महिलांना लहान मुलांसह उभे राहून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महिलांच्या राखीव आसनांवर पुरुष प्रवासी

महिलांसाठी राखीव असलेल्या आसनांवर पुरुष प्रवासी बसत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. त्यामुळे महिलांना आरक्षित जागा उपलब्ध असूनही उभ्याने प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः गर्दीच्या काळात महिला प्रवाशांना स्वतःच्या राखीव जागेसाठी वाहकांकडे तक्रार करावी लागत असल्याचे प्रकार वाढले आहेत.

प्रवाशांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या थांब्यावर राखीव जागेवर इतर प्रवासी बसले असल्यास त्यांना उठविणे शक्य होते; मात्र बस प्रवास सुरू झाल्यानंतर मधल्या थांब्यावर चढणाऱ्या महिला किंवा इतर लाभधारक प्रवाशांसाठी संबंधित जागेवर बसलेल्या प्रवाशाला उठविण्यात अनेकदा अडचणी येतात.

तक्रार कुठे कराल?

महिलांसाठी राखीव आसनावर पुरुष प्रवासी बसला असल्यास आणि महिलेला उभे राहावे लागत असल्यास संबंधित महिलेला बस वाहकाकडे तक्रार करता येते. नियमानुसार वाहकाने आरक्षित आसन महिला प्रवाशाला उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

बसमध्ये कुणासाठी किती जागा राखीव?

एसटी प्रशासनाकडून विविध प्रवासी घटकांसाठी स्वतंत्र आसने राखीव ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये :

  • ६ जागा महिलांसाठी
  • ४ जागा दिव्यांग प्रवाशांसाठी
  • २ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी
  • २ जागा स्वातंत्र्यसैनिकांसाठी
  • २ जागा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी

अशा प्रकारे आरक्षण करण्यात आले आहे.

राखीव जागांचे नियम काय?

एसटीच्या नियमानुसार, राखीव प्रवासी बसमध्ये नसल्यास त्या जागेवर इतर प्रवासी बसू शकतात. मात्र संबंधित लाभधारक प्रवासी बसमध्ये आल्यानंतर त्या जागेवर बसलेल्या प्रवाशाने जागा रिकामी करून देणे आवश्यक असते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

बसस्थानकांवरही वाढली गर्दी

उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम एकाचवेळी सुरू असल्याने जिल्ह्यातील बसस्थानकांवर दररोज मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक बसेस क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी भरून धावत असून काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्यांची मागणीही वाढत आहे.

दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त बसेस सुरू कराव्यात तसेच राखीव आसनांच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

0 9 7 6 4 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *