सत्तरी ओलांडलेल्या शिवभक्त रंगनाथ महाराजांच्या भिक्षा झोळीला उदंड प्रतिसाद

Khozmaster
3 Min Read

श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या विकासाचे पूर्ण होणार स्वप्न

 

 

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

 

जामनेर तालुक्यातील पहूर येथील भक्त ऐसे जाणा जे देही उदास

गेले आशा पाश निवारुनी ॥

विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ॥

निर्वाणी गोविंद असे मागेपुढे 

काहीच साकडे पडो नेदी ॥

तुका म्हणें सत्य कर्मा व्हावे साह्य

घातली भर नरका जाणे ॥

 

या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपण समाजाचे एक देणं लागतो , या कृतार्थ भावनेतून संपूर्ण जीवनपुष्प शिवभक्तीत समर्पित करून सत्तरी पार केलेल्या शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार व परिसर विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन केलेल्या आजीवन भिक्षा झोळी संकल्पास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे .

पहूर – शेंदुर्णी मार्गावर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर वसले आहे .या संगमावर स्नान करून महादेवाची मनोभावे प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होतात , अशी भाविकांची श्रद्धा आहे .

सन १९९१ मध्ये मंदिराचे पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी ४२ दिवसांचे मौनव्रत अनुष्ठान करून लोकवर्गणीतून सुंदर मंदिर उभारले . सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी सन २००६ मध्ये श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर विश्वस्त संस्थेस ई .१०८६ नुसार नोंदणी करण्यात आली आहे .दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो . देवळी व गोगडी नद्यांवर घाट बांधणे ,मंदिरासमोर असलेल्या खुल्या भूखंडावर संत निवास ,सभा मंडप , पिण्याच्या पाण्याची सोय , वृक्षारोपण , बालोद्यान , कंम्पाऊंड , परिसर सुशोभीकरण करणे , गोशाळा उभारणे , बाल संस्कार केंद्र , ध्यान केंद्र , धार्मिक ग्रंथालय उभारणे , मंदिराचे संवर्धन आणि संरक्षण करणे , यात्रोत्सवासाठी मैदान तयार करणे , व्यायाम शाळा उभारणे , भाविकांसाठी भक्तनिवास , आदी विकास कामांसाठी विजयादशमीपासून मंदिराचे पुजारी व श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केलेल्या आजन्म भिक्षा झोळी संकल्प भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे .

सत्तरी ओलांडलेल्या महाराजांनी प्रचंड उत्साहाने संकल्प केला असून सायकलद्वारे ते शंखनाद करीत गावांत आणि पंचक्रोशीत भिक्षा मागत आहेत .

आज पर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मंदिराला मिळालेला नसून केवळ लोकसहभागातूनच मंदिर विकासाचे कार्य शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अविरत परिश्रमाने पूर्णत्वास जात आहे . भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टने केले आहे . महाराजांनी सुरू केलेल्या या कार्यास पहूर आणि पंचक्रोशीतून सढळ हाताने मदत मिळत आहे .

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *