जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील तरुणाचा नाचनखेडा शिवारात असलेल्या शेतात रानडुकराच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र गोपीनाथ पाटील वय 42 हा जोगलखेडा शिवारातील महादू लक्ष्मण वनारसे राहणार नाचनखेडा तालुका जामनेर यांच्या शेतात कपाशी वेचण्याचे काम करीत असतांना रानडुकराने त्याच्यावर हल्ला करून हातांना, पायांना, चावा घेऊन गंभीर जखमी केले. अशा अवस्थेत असताना लागलीच 108 ॲम्बुलन्स बोलावून त्याला पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. जोगलखेडा गावात सदर घटनेमुळे दुःखाचे सावट पसरले आहे. मयत जितेंद्र गोपीनाथ पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. याबाबत जोगलखेडा तालुका जामनेर येथील पोलीस पाटील विजय त्र्यंबक पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.