मेहकर- मातोश्री एज्यूकेशन सोसायटी मेहकर, द्वारा संचालित, सत्यजीत इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई) खंडाळा, मेहकरच्या विद्यार्थ्यांनी हिवराश्रम येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आणि राष्ट्रीय नाट्योत्सव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. दि. 30 /8 /2022 रोजी विवेकानंद ज्ञानपीठ, हिवरा आश्रम येथे तालुकास्तरीय राष्ट्रीय नाट्योत्सव स्पर्धेमध्ये सादर केलेल्या नाटिकेचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला असून त्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली. शिक्षण विभाग पंचायत समिती मेहकर आणि तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या नाट्यस्पर्धेत स्कूलचे इयत्ता दहावीचे सार्थक इंगोले, विवेक दराडे, पियुष आडे, आदित्य क्षीरसागर, वेदांग देशपांडे, प्रथमेश बाजड, भक्ती अवस्थी आणि वेदिका तुपकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. सोबतच 49वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये वर्ग 6 ते 8 गटामध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रितिशा सुभाष खुरद हिचा तालुका पातळीवर प्रथम क्रमांक आला असून हिची सुद्धा जिल्हा पातळीवर निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य रवींद्र माळी, शिक्षक ज्ञानेश्वर खरात, ज्ञानेश्वर हिवरकर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या निमित्ताने संस्थाध्यक्ष माननीय श्यामभाऊ उमाळकर, संस्था सचिव माननीय भूषणभाऊ मिनासे सर यांनी या सर्वांचे कौतुक करून मानवाने विज्ञानाची कास धरल्यास जीवनाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी मदत होत असल्याचे सांगितले. या सत्कार समारंभाच्या वेळेस गटशिक्षणाधिकारी माननीय मधुकर वानखेडे साहेब, तालुकास्तरीय विज्ञान शिक्षक संघटना तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती, मेहकर चे सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.