शेतात कापूस वेचताना एका महिलेला केलं ठार.
या वर्षी आतापर्यंत 41 बळी.
देवेंद्र सिरसाट नागपूर चंद्रपूर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघाची आणि बिबट्याची दहशत प्रसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघांनी आणि बिबट्यांनी मिळून अनेकाचा बळी घेतला आहे.
अशीच एक घटना मुल तालुक्यातून समोर आली आहे. शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केले.
ही घटना मूल तालुक्यातील कांतापेठ येथे मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. कल्पना अरुण लोनबले वय 45, रा. कांतापेठ असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे. या वर्षात आता पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने घेतलेला हा 41 वा बळी आहे.
कांतापेठ येथे राहणारी 45 वर्षीय कल्पना लोनबले ही महिला सकाळी शेतामध्ये कापूस वेचायला गेली होती. कापूस वेचत असताना शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला करुन जवळपास शंभर मीटर अंतरावर फरफटत नेले. वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 523 मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहायक राकेश कुमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.महिनाभरापूर्वी याच तालुक्यातील चिरोली व चिचाळा येथील दोघांना वाघाने हल्ला करून जागीच ठार केले होते. कांतापेठ येथील ताज्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.