नाथषष्ठीतील ९० वर्षांपासूनचा ‘टुरिंग टॉकीज’चा बाजार उठला

Khozmaster
2 Min Read

पैठण, (संजय धाडवे) मूकपट ते बोलक्या – चित्रपटापर्यंतचा चालताबोलता इतिहास असलेल्या नाथषष्ठी यात्रोत्सवातील ‘टुरिंग टॉकीज’चा ९० वर्षांचा बाजार यावर्षी हायटेक यंत्रणेमुळे अक्षरशः उठला आहे. यंदा एकाही फिरत्या सिनेमागृहाची नोंद झाली नाही. त्यामुळे ही बाब समोर आली आहे ।मूकपटापासूनचा इतिहास….. यंदा एकाही फिरत्या सिनेमागृहाची नोंद झाली नसल्याने पडद्यावर पिक्चर पाहण्याच्या कालबाह्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. बदलत्या काळानुसार हायटेक यंत्रणेद्वारे नवनवीन चित्रपट घरबसल्या पाहायला मिळत आहेत. पेनड्राइव, टीव्ही व गुगल यामुळे ‘यात्रेतील सिनेमा’ ही कल्पनाच आता जुनाट झाली असल्याचे समोर आले आहे.एकेकाळी नाथषष्ठी यात्रोत्सवातील टुरिंग टॉकीज हा सर्वाधिक आकर्षण व तत्कालीन तरुणांसाठी मनोरंजनाचा विषय होता. भारतीय स्वातंत्र्यापूर्वीपासून नाथषष्ठी यात्रेत फिरती सिनेमागृहे येत असे. मूकपट असतानाही यात्रेत फिरती सिनेमागृहे ही मुख्य आकर्षण केंद्रे होती. याशिवाय तमाशे आणि सर्कस याकडेच हौसे, नवशे गवशे यांची गर्दी हमखास असायची. याबाबत बोलताना जुन्या पिढीतील सिनेमाप्रेमी वसंत वासुंदेकर यांनी सांगितले की, ‘मूकपट असल्यापासून पैठणच्या यात्रामैदानात फिरती चित्रपटगृहे येत होती. खरे म्हणजे हेच मुख्य आकर्षण होते. जवळपास ९० वर्षांची ही परंपरा आहे. करमणुकीची साधने मर्यादित होती. त्यामुळे याला महत्त्व होते.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी २ फिरती सिनेमागृहे आली होती. परंतु अल्पप्रतिसाद मिळाल्याने यंदा त्यांनीही पैठणच्या नाथषष्ठी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. यंदा एकाही फिरत्या सिनेमागृहाची नोंद झाली नाही. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच एकही ‘टुरिंग टॉकीज’ आलेली नाही. त्यामुळे फिरत्या सिनेमागृहाची क्रेझ संपुष्टात आल्याचे समोर आले आहे. मागील १० वर्षांपासून हळूहळू फिरत्या सिनेमागृहाचे आकर्षक कमी कमी होत असल्याचे चित्र आहे.जुनेजाणते सिनेरसिक वसंत वासुंदेकर यांनी सांगितले की, ‘मुळवडीच्या दिवशी रंगोत्सव थांबल्यावर नाथमंदिराकडे जाताना पंपहाऊसच्या बाजूला सिनेमा टॉकीजचे सामान येऊन पडलेले असायचे. बल्ल्या, कनातीचे कापड दिसायचे. अन् एखादा आवडता पाहुणा घरी आल्यासारखा आनंद व्हायचा. इतस्ततः पडलेल्या पोस्टरवर ‘धोत्रा यात्रेमध्ये’ असे रंगाने लिहिलेले असे. (षष्ठीच्या आधी धोत्रा गावची यात्रा असते) सगळयात आधी गणेश टुरिंग टॉकीज यायची. सध्या जिथे पितांबरी मंगल कार्यालय आहे. तेथे तिची फिक्स जागा होतो. येथे हमखास धार्मिक सिनेमा असायचा. त्याचे मोठमोठे पोस्टर चमको वगैरे लावून सजविलेले असायचे.’ आशा आठवणी त्यांनी जागवल्या.

 

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *