पेपरफुटी रोखण्यासाठी ‘कस्टम कोटिंग’ आणि डिजिटल ट्रॅकिंगचे ब्रह्मास्त्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेची हायटेक सुरक्षा व्यवस्था

KHOZ MASTER
2 Min Read

नागपूर
‘नीट’ आणि बारावी परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंदा ‘कस्टम कोटिंग’ आणि ‘डिजिटल ट्रॅकिंग’सारख्या हायटेक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

परीक्षेतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर विशेष, सूक्ष्म आणि अदृश्य डिजिटल कोड असणार आहे. या ‘कस्टम कोटिंग’ तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास संबंधित पेपर नेमका कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या परीक्षा केंद्रावरील आणि कोणत्या बाकावरील उमेदवाराचा आहे, हे काही मिनिटांत शोधणे शक्य होणार आहे.

याशिवाय प्रश्नपत्रिका वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची हालचाल थेट नियंत्रण कक्षातून पाहता येणार असून, कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित लक्षात येणार आहे.

यंदा राज्यभरातून सुमारे सहा लाख उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी मानवी हस्तक्षेप कमी करून ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’ आणि बायोमेट्रिक पडताळणीसारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे.

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर हाय-फ्रिक्वेन्सी जॅमर बसविण्यात येणार असून त्यामुळे ब्लूटूथ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स निष्क्रिय होतील. तसेच पुण्यातील मुख्य नियंत्रण कक्षातून राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांचे सीसीटीव्ही चित्रीकरण थेट पाहिले जाणार आहे.

ओएमआर उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, त्यामध्ये फेरफार करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचा दावा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, पेपरफुटीच्या घटनांमुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी यंदाची ‘टीईटी’ परीक्षा अभेद्य सुरक्षा कवचात घेण्यात आल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

0 9 7 2 2 5
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *