बुलढाणा
यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत असताना बुलढाणा जिल्हा प्रशासनाने संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यापक कृषी कृती आराखडा तयार केला आहे. पावसातील खंड, वाढते तापमान आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृषी विभागाने ‘कमी पाण्यात अधिक उत्पादन’ या सूत्रावर भर देत सूक्ष्म सिंचन, मृद व जलसंधारण आणि हवामानानुकूल पीक नियोजनाचा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.
जिल्ह्यात नव्याने तब्बल ५९ हजार ९९१ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठिबक आणि तुषार सिंचनामुळे जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना या पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून, २०२३-२४ या वर्षात १७ हजार ५०९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले होते.
दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. झाडांवरील बाष्पीभवन कमी करण्यासाठी ‘काओलीन’ फवारणी, मल्चिंगद्वारे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, सकाळ-संध्याकाळ पाणी देणे आणि ठिबक सिंचनाचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी आणि इतर फळबाग पट्ट्यांसाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
एल निनोमुळे पावसाचा खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. सोयाबीनसाठी ‘एएमएस-१००-३९’, ‘एमएयूएस-७२५’, तर तुरीसाठी ‘बीडीएन-७११’ आणि ‘फुले-१२’ या वाणांना प्राधान्य देण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. “७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका,” असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने शेतकऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ७८ हजार १२० हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘रुंदी सरी वरंबा’ अर्थात बीबीएफ पद्धतीला प्राधान्य देत १८ हजार ६०० हेक्टरवर ही पद्धत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चिखली, खामगाव आणि मेहकर तालुक्यांमध्ये या मोहिमेवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांत विविध योजनांतून ३०९ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, जलसाठा वाढविणे, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि शेतीला पूरक सिंचन उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे. तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी ‘जमीन सुपीकता निर्देशांक’ आधारित खत व्यवस्थापनावरही कृषी विभागाने भर दिला आहे.
संभाव्य एल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात ‘पाणी वाचवा, पीक वाचवा’ ही मोहीम आता प्रत्यक्ष कृती आराखड्यात उतरू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Users Today : 23