मुंबई
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असून त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर झाला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठत ९६.१४ पर्यंत घसरण नोंदवली. दिवसअखेर रुपया २२ पैशांच्या घसरणीसह ९५.८६ वर बंद झाला.
रुपयातील या घसरणीमुळे देशातील महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पेट्रोल-डिझेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आयातीत औषधे, खतं तसेच परदेशी शिक्षण आणि विमानप्रवास महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, चालू वर्षात रुपयामध्ये सहा टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून, केवळ सहा व्यवहार सत्रांमध्ये जवळपास दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. रुपयाच्या कमकुवत होत चाललेल्या स्थितीमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली असून अर्थ मंत्रालयातील ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये तातडीच्या बैठका आणि उपाययोजनांची हालचाल सुरू झाली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०९ डॉलरवर पोहोचल्याने आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. इराण युद्धाचा धोका, मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि परकीय गुंतवणूकदारांचा कमी झालेला ओघ ही रुपया घसरणीची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
देशांतर्गत मागणीवर अर्थव्यवस्था टिकवून ठेवणे कठीण होत असल्याने सरकार आता परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देत आहे. यासाठी बाँड मार्केटमधील गुंतवणुकीवरील ‘विथहोल्डिंग टॅक्स’ कमी करण्याचा विचार सुरू असून, परकीय गुंतवणूकदारांसाठी नियमावली सुलभ करण्याची तयारीही सरकारकडून करण्यात येत आहे.
शेअर बाजारावरही या परिस्थितीचा परिणाम दिसून आला. सेन्सेक्स १६० अंकांनी घसरून ७५ हजार २३७ वर बंद झाला, तर निफ्टी ४६ अंकांनी घसरून २३ हजार ६४३ वर स्थिरावला. मात्र, गुरुवारी परकीय गुंतवणूकदारांनी १८७ कोटी रुपयांची खरेदी केल्याची नोंद झाली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात रुपया, महागाई आणि गुंतवणूक या तिन्ही आघाड्यांवर सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Users Today : 23