लोकसभेला भाजप-मित्रपक्षांना महाराष्ट्रात ‘चाळिशी’ गाठणं कठीण, दक्षिण भारतही अवघड, योगेंद्र यादवांचं भाकित

Khozmaster
2 Min Read

पुणे : ‘राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वारे वाहू लागल्याचे चित्र निर्माण केले जात असले; तरी आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नाही. या निवडणुकीत भाजपला हरवणे शक्य आहे,’ असे भाकीत राजकीय तज्ज्ञ आणि स्वराज्य इंडिया अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना वर्तवले.
‘भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीला रोजच्या जगण्यातील प्रश्न जनतेसमोर मांडावे लागतील,’ असेही त्यांनी सांगितले.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल, आगामी लोकसभा निवडणूक, भारत जोडो यात्रा; तसेच राजकीय पक्षांची वाटचाल अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.
तीन राज्यांतील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, त्याचा त्यांना निश्चित फायदा होईल. विजयामुळे भाजपच्या बाजूने वारे वाहू लागले आहे; पण त्यामुळे २०२४ चे चित्र स्पष्ट होत नाही. २०१९ प्रमाणे लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०३ जागा निवडून आणणे भाजपला सोपे नाही. सद्यस्थितीवरून दक्षिण भारतात भाजपला यश मिळणे अवघड आहे. महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांकडे ४१ जागा असून, सध्याच्या राजकीय साठमारीत या जागा पुन्हा जिंकणे शक्य आहे का,’ याकडे यादव यांनी लक्ष वेधले.‘आगामी निवडणुकीत भाजपला विरोधकांचे निश्चित आव्हान असल्याने आतापासून भाजप जिंकला म्हणणे केवळ आत्मप्रौढी आहे. राज्यघटना आणि देशाचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक असेल,’ अशी टिप्पणी यादव यांनी केली.

पुन्हा पुलवामा ?

मागच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजप तीन राज्यांत पराभूत झाला होता; पण पुलवामा घडले आणि लोकसभेत भाजपला यश मिळाले. पुलवामासारखे काही तरी घडण्याची भीती पुन्हा व्यक्त होत आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्मिती होत असलेल्या राम मंदिराचे श्रेय भाजप घेत आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर उन्मादाचा फायदा उठवण्याचे प्रयत्न होतील,’ असे निरीक्षण योगेंद्र यादव यांनी वर्तवले.हरलेली निवडणूक जिंकणे याचे उदाहरण तेलंगणा, तर जिंकलेली निवडणूक हारणे याचे उदाहरण राजस्थान आहे. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षात जीव आला असला तरी तेलंगणाच्या विजयाचे ते एकमेव कारण नाही. शिवराजसिंह चौहान यांचे सरकार अजिबात लोकप्रिय नसताना त्यांना सर्वाधिक जागा कशा मिळाल्या, याचा इंडिया आघाडीने अभ्यास केला पाहिजे.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *