नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना फसविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन येथे रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. ‘पैसे दुप्पटच्या प्रकरणात ३९ कोटी रुपये बुडाले आहेत. यात पोलिसांनी कारवाई केली. मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने जामीन दिला होता. मात्र, तो रद्द करून पुन्हा अटक करण्यात आली आहे. मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ९ कोटींची रोख यासह दीड कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नागरिकांचे पैसे परत करण्याची कारवाई लवकरच सुरू करू. मालमत्ता विकण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत करण्यात येईल. अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी कारवाई करण्यात येईल. गुन्हा घडल्यानंतरही अनेक जण शांत राहतात. कारवाई होत असताना लोक पुढे येतात. बोगस योजनांना बळी पडू नका’, असे फडणवीस म्हणाले.
Users Today : 2