मरवडे : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आक्रमक झाले असून हिवाळी अधिवेशनातच जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी यासाठी मंगळवार दि.12 रोजी नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन जनक्रांती मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील हजारो पेन्शन फायटर या पेन्शन लढ्यात सहभागी होणार आहेत. कोण म्हणतो देणार नाही?, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पेन्शन फायटर्सकडून दिला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. ही नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यासाठी अन्यायकारक असून 1982 च्या आदेशानुसार आम्हाला जुनी पेन्शन योजना मंजूर करावी यासाठी गेल्या सतरा वर्षापासून कर्मचारी लढा देत आहेत.
मार्च महिन्यात राज्यभर करण्यात आलेल्या संपामुळे शासनाने कुटुंब निवृत्ती वेतन योजना तसेच निवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना सर्वांना पूर्व लक्ष्मी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्याचे समोर आले असून हा अहवाल सुधारित एनपीएस सुचविणारा असल्यास जुनी पेन्शन लढा अधिक तीव्र करण्यात येईल.
जुनी पेंशन व्यतिरिक्त इतर पर्याय राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना अमान्य आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने येत्या 12 डिसेंबरला पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन केले असून राज्यातील 10 लाख कर्मचारी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन मागणीसाठी सहभागी होणार आहेत त्यामुळे नागपूरात 12 डिसेंबर ला जुन्या पेन्शनचे वादळ धडकणार आहे .
Users Today : 2