पुणे: शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांमधील देखणी वास्तू ‘शिंदे छत्री’ लवकरच नव्या रुपात पर्यटकांसमोर येणार आहे. शिंदे छत्रीच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून वास्तूच्या ऐतिहासिक रुपाला धक्का न लावता कारागीर मोठ्या कौशल्याने रेखीव कामाला झळाळी देत आहेत. तीनशे वर्षे जुनी ही इमारत पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे.
वानवडीमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर असलेली महादजी शिंदे छत्री ही वास्तू अठराव्या शतकातील ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार आहे. शिंदे देवस्थान ट्रस्टअंतर्गंत महादजी शिंदे छत्रीची देखभाल केली जात असून, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ‘पीएमपी’च्या पुणे दर्शनच्या बसच्या मार्गात या वास्तूचा समावेश असल्याने दररोज पर्यटकांची वर्दळ असते. शिंदे छत्रीचा इतिहास आणि वास्तू बघण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र, काही वर्षांत या इमारतीच्या छताला भेगा पडल्याने पावसाळ्यात पाण्याची गळती सुरू झाली होती. दगडांच्या पृष्ठभागावर शेवाळ्यासदृश थर साठला होता. भिंतीवरही तडे दिसत होते. वास्तूचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी ट्रस्टने वर्षभरापूर्वी वास्तूच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी काम सुरू झाले असून, छत गळती, दरवाजे, खिडक्यांची दुरूस्ती सुरू आहे. पावसाच्या पाण्यापासून वास्तू सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञांचे पथक काम करते आहे, अशी माहिती ट्रस्टचे राज्याचे अधीक्षक यशवंत भोसले यांनी दिली.
राजस्थानी स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण असणाऱ्या या वास्तूच्या पायऱ्या, कमानी, खांबाची रचना, घुमटांवरील रेखीव नक्षीकाम सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. वास्तूची बाह्य बाजू आणि आतील भाग दोन्हीवर नाजूक नक्षीकाम करण्यात आले आहे. आतील बाजूस काचेचे झुंबर आणि चित्र कला ऐतिहासिक कला प्रकार उलगडतात. अँग्लो-राजस्थानी बांधकामशैलीमुळे दोन वेगवेगळ्या संस्कृतीचे चित्रण बघायला मिळते. या वास्तूच्या रंगीत खिडक्या इंग्रजी पद्धतीच्या आहेत. ऐतिहासिक ठेव्याला धक्का न लावता वास्तूचा जीर्णोद्धार करण्यात येतो आहे. महिनाभरात काम पूर्ण होईल. पर्यटकांना लवकरच नव्या रुपात वास्तू बघायला मिळले, असे यशवंत भोसले यांनी सांगितले.
Users Today : 16