पुणे : ताफ्यातील बसची कमी झालेली संख्या आणि आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर धावत असतानाही गेल्या आर्थिक वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नात ६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नात अल्पशी वाढ झाली असताना, पीएमपीचा खर्च दीड हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, उत्पन्नवाढीमुळे यंदा पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांना द्याव्या लागणाऱ्या संचलन तुटीमध्ये पहिल्यांदा घट होण्याची शक्यता आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत ‘पीएमपी’कडून १,७०० बसच्या माध्यमातून बस सेवा दिली जाते. गेल्या वर्षी पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासह तोट्यातील बसचे काम कमी करण्यावर ‘पीएमपी’कडून भर देण्यात आला होता. पहाटे व रात्री उशिराच्या मोकळ्या जा-ये करणाऱ्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. रिकामी फेरी कमी करण्यासाठी मुक्कामी बसची योजनाही सुरू केली.त्यामुळे ‘पीएमपी’चे उत्पन्न चांगलेच वाढले होते. महिन्याला ४० ते ४२ कोटी रुपये असलेले उत्पन्न ५० कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात ‘पीएमपी’चे एकूण उत्पन्न ७३३ कोटी रुपयांवर पोहोचले. पीएमपीला २०२२-२३मध्ये एकूण ६६८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यात गेल्या आर्थिक वर्षात ६५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ‘पीएमपी’चे एकीकडे उत्पन्न वाढले असले, तरी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे खर्चात १५३ कोटींनी वाढ झाली आहे. ‘पीएमआरडीए’ने त्यांच्याकडून दिला जाणारा २०० कोटी रुपयांचा हिस्सा ‘पीएमपी’ला दिल्यामुळे दोन्ही महापालिकांवरील ताण कमी झाला आहे.पीएमपीला प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी ३,७०० बसची आवश्यकता आहे. सध्या ‘पीएमपी’कडे निम्म्याच बस आहेत. त्यातील ५०० बसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे पीएमपीचा ताफा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांना पीएमपीला तातडीने बस खरेदी करून देण्याची गरज आहे. सध्या ४०० बसची खरेदी प्रक्रिया सुरू आहे; पण तेवढ्या बस उपलब्ध झाल्या, तरी प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पीएमपीला आणखी तेवढ्याच बस खरेदी करून दिल्यास सेवा चांगली होईल.‘पीएमपी’कडून ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ४००पेक्षा जास्त बसद्वारे सेवा दिली जाते. त्या बदल्यास ‘पीएमआरडीए’ने गेल्या वर्षी २०० कोटी रुपये ‘पीएमपी’ला दिले आहेत. पीएमपीच्या डेपोसाठी काही जागा दिल्या जाणार आहेत; पण पीएमपीकडे बसची कमतरता असल्यामुळे ‘पीएमआरडीए’ने त्यांच्या हद्दीत चालविल्या जात असतील, तेवढ्या बस खरेदी करून दिल्यास सेवा सुधारण्यास हातभार लागणार आहे. याबाबत ‘पीएमआरडीए’कडे मागणी केल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Users Today : 30