मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी ठराविक लोकांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट घालतंय असा आरोप केला.
तर जरांगे पाटील यांनी ओबीसी उपोषण हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजताचा वेळ दिला आहे.
ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. ते म्हणाले की, या माध्यमातून त्यांना दंगल घडवायची आहे. पण सरकारला हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. गाव गाड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देणार नाही. मी एक पाऊल मागे घेऊन पण कोणत्याही परिस्थितीत सरकारला जिंकू देणार नाही. जर १३ तारखेला दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही सरकार बुडवणार असल्याचा इशारासुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न सोडवणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठेही दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. ना ओबीसी, ना मराठा समाज, कोणाचं अहित होऊ नये. सरकार कुणाचंही अहित करण्याच्या मानसिकतेत नाही. आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून हे सरकार सोडवणार आहे.
ओबीसींच्या शिष्टमंडळात कोण?
सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि अतुल सावे हे मुंबईला जाणार आहे. त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. ओबीसी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती असणार आहे.
कायदा सुव्यवस्थेसाठी AI चा वापर करणार
हिट अँड रनच्या वाढत्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेसाठी AIचा वापर करणार आहे. देशभरात महाराष्ट्राचं पोलीस दल अधुनिक आहे. गुन्हयात तपासणीसाठी एआयचा वापर होईल. हिट अँड रन प्रकरणात नंबर प्लेट ओळखता येणारा कॅमेरा नसला तर त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेऊ. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभा करत आहोत. ट्राफिक मॅनेजमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
पोलीस भरती पावसाळ्यात, उमेदवारांची गैरसोय
ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेतली जात असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. याबाबत विचारण्यात आले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती चाचण्या पुढे ढकलल्या. अनेकांचे वय जाते, त्यांच्यासाठी शेवटची ठरू शकते. जिथे पाऊस नाही तिथे चाचण्या सुरू आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार येत आहेत. त्यांच्यासाठी व्यवस्था नाहीत. मुले अनेक ठिकाणी बसस्थानकात झोपलेली दिसतात. त्यांची व्यवस्था करण्याचेही आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
Users Today : 23