विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

Khozmaster
2 Min Read

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली नसली तरी राज्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. एकीकडे लोकसभा निडणुकीत अनपेक्षित धक्का बसल्यानंतर सत्ताधारी महायुतीने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका ओपिनियन पोलमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात कुणाचा विजय होऊ शकतो, याबाबत ओपिनिन पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, अशी आकडेवारी समोर आली आहे.

टाइम्स नाऊ आणि मॅट्रिझ यांनी केलेल्या या सर्व्हेमधून महाराष्ट्रात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास कुणाची सत्ता येऊ शकते, याबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास भाजपा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळू शकतात. तर शिवसेना शिंदे गटाला १९ ते २४ जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गचाला ७ ते १२ जागांवरत समाधान मानावे लागू शकते. अशा प्रकारे महायुतीला आजच्या घडीला निवडणूक झाल्यास १२१ ते १४१ जागा मिळू शकतात.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येकाँग्रेसला ४२ ते ४७ जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २३ ते २८ जागा मिळू शकतात. अशा प्रकारे सद्यस्थितीत महाविकास आघाडीला ९१ ते १०६ जागा मिळू शकतात.

याशिवाय अपक्ष आणि इतर पक्षांच्या खात्यामध्ये ११ ते १६ जागा जातील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ४० ते ४२ जागांवर अत्यंत चुरशीची लढत असल्याचेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

आता मतांच्या टक्केवारीबाबत या सर्व्हेमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार भाजपाला २५.८, शिवसेना शिंदे गटाला १४.२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५.२ टक्के मतं मिळतील. तर काँग्रेसला १८.६, शिवसेना ठाकरे गटाला १७.६ आणि शरद पवार गटाला ६.२ टक्के मतं मिळतील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय अपक्ष आणि इतरांच्या खात्यात १२.४ टक्के जातील, असा अंदाजही या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *