तेलंगणात भीषण अपघात : बस आणि ट्रकची समोरासमोर धडक — २० हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Khozmaster
2 Min Read

चेवेल्ला (जि. रंगारेड्डी), वार्ताहर : तेलंगण राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही दुर्घटना हैदराबाद-विजापूर महामार्गावर मिर्झागुडा गावाजवळ घडली. तंदूर डेपोची एक आरटीसी बस प्रवाशांसह जात असताना गिट्टीने भरलेल्या हायस्पीड टिप्पर ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की ट्रकमधील खडी थेट बसमध्ये शिरली आणि बसमधील प्रवासी अक्षरशः चिरडले गेले. ट्रक चालकाचाही या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी आरडाओरड, किंकाळ्या आणि रक्ताचा सडा अशी हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळाली. काही प्रवाशांचा मृतदेह बसच्या लोखंडी सांगाड्यात अडकला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमींना चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन बचाव आणि मदतकार्य गतीने पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक काही काळासाठी बंद करून अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी टिप्पर चालकाचा वेग आणि निष्काळजीपणा हे प्रमुख कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ आणि दुःखाचे वातावरण पसरले असून स्थानिकांनी प्रशासनाकडे सुरक्षित वाहतुकीसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 विशेष प्रतिनिधी, तेलंगण

0 8 9 4 5 8
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *