मुंबई :
उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर प्रवर्तन निदेशालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने जवळपास 3,084 कोटी रुपयांची संपत्ती अस्थायी जप्त केली असून, यात अंबानी यांचं मुंबईतील पाली हिल परिसरातील 17 मजली आलिशान घरदेखील समाविष्ट आहे.
या कारवाईनंतर अनिल अंबानी यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
आलिशान “Abode” आता सरकारच्या नियंत्रणाखाली
पाली हिलमधील या 17 मजली इमारतीचं नाव “Abode” आहे. पश्चिम मुंबईच्या सर्वात महागड्या भागात असलेलं हे घर १६ हजार चौरसफूट क्षेत्रफळावर पसरलेलं असून, उंची जवळपास ६६ मीटर आहे.
या घरात सर्व अत्याधुनिक सुविधा — स्विमिंग पूल, जीम, मल्टिलेव्हल गॅरेज, लक्झरी कार कलेक्शन आणि हेलिपॅड आहेत.
Housing.com च्या अंदाजानुसार या आलिशान इमारतीची किंमत सुमारे ५,००० कोटी रुपये आहे. अनिल अंबानी आपल्या पत्नी टीना अंबानी आणि कुटुंबासह याच घरात वास्तव्यास आहेत.
ईडीची देशभरातील जप्ती
प्रवर्तन निदेशालयाने ३,०८४ कोटी रुपयांच्या संपत्तीवर ताबा मिळवला आहे.
ही कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात आली.
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत —
-
मुंबईतील पाली हिलचं घर
-
दिल्लीतील रिलायन्स सेंटर
-
नोएडा, गाजियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील विविध संपत्ती
अशा आठ शहरांतील मालमत्तांचा समावेश आहे.
यात रहिवासी फ्लॅट्स, ऑफिस स्पेस, आणि जमीन तुकडे आहेत.
कोणत्या कंपन्या ईडीच्या रडारवर?
ईडीच्या तपासात रिलायन्स समूहातील दोन वित्तीय कंपन्या केंद्रस्थानी आहेत :
-
Reliance Home Finance Ltd (RHFL)
-
Reliance Commercial Finance Ltd (RCFL)
या कंपन्यांवर जनतेकडून आणि बँकांकडून घेतलेला निधी चुकीच्या पद्धतीने वळवण्याचा आरोप आहे. त्यामुळेच या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे.
प्रतिष्ठेवर घाव
पाली हिलमधील “Abode” हे केवळ एक घर नसून, अनिल अंबानी यांच्या वैभवाचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जात होतं. आता ही इमारत सरकारच्या नियंत्रणाखाली गेल्याने उद्योगजगतात मोठी चर्चा रंगली आहे.
एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणारे अनिल अंबानी यांच्यासाठी ही कारवाई मोठा धक्का आणि प्रतिमेवर घाव मानली जात आहे.
Users Today : 18