मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती जाहीर; ‘मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच’ – राज ठाकरे

Khozmaster
2 Min Read

मुंबई  ;-

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. दोन्ही नेते आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असून, केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील २९ महापालिकांमध्ये संयुक्तपणे निवडणूक लढवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

युती जाहीर करताना राज ठाकरे यांनी थेट महायुतीला इशारा देत म्हटले की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार.” महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी ही युती असल्याचे दोन्ही नेत्यांनी ठामपणे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. ही युती कोणत्याही सत्तेसाठी नाही, तर मराठी माणसासाठी आहे.” राज्यातील राजकीय परिस्थिती, मुंबईतील मराठी माणसाचा प्रश्न आणि महापालिकेतील कारभार यावर दोन्ही पक्षांची समान भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर टीका करताना काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावाही केला. “ते काय बोलतील, त्यावर मी उत्तर देईन. माझ्याकडे अनेक व्हिडीओ आहेत,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री व महायुतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

दरम्यान, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच संकेत दिले होते. अखेर आज ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे युतीची घोषणा करत ही चर्चा सत्यात उतरवली. या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात नवी ताकद उभी राहणार असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठी राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *