मुंबई विशेष प्रतिनिधी ;-
मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीचा बिगुल अखेर वाजला असून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय रणसंग्रामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या वेळी दोन्ही नेत्यांचा रोख स्पष्टपणे भाजप आणि शिंदे गटाकडे होता.
राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका करत, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत थेट संघर्ष अटळ असल्याचे संकेत दिले. “मुंबईत सामना भाजप आणि शिंदे सेनेविरोधातच होणार,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
मुंबई महापालिकेसाठी ऐतिहासिक युती
राज ठाकरे यांनी सांगितले की, तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असून मुंबई महापालिका निवडणूक मनसे-शिवसेना एकत्र लढणार आहे. केवळ मुंबईपुरतेच नव्हे, तर राज्यातील इतर ९ महापालिकांमध्येही युती होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
“मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच असेल आणि महापालिकेवर भगवाच फडकणार,” असा ठाम दावा राज ठाकरे यांनी केला.
‘माझ्याकडे असंख्य व्हिडीओ आहेत’
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले,
“एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ सध्या फिरत आहे, ज्यात ते ‘अल्लाह हाफीज’ म्हणत आहेत. त्यांनी मला या गोष्टी शिकवू नयेत. माझ्याकडे असंख्य व्हिडीओ आहेत. ते काय बोलतील, त्यावर मी व्हिडीओ लावणार आहे.”
या वक्तव्यानंतर आगामी प्रचारात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांचा मराठी मतदारांना संदेश
उद्धव ठाकरे यांनी या वेळी मराठी मतदारांना थेट साद घातली.
“भाजपला काय हवं आहे ते भाजपने पाहावं. मराठी माणसाला काय हवं आहे, ते आम्ही पाहत आहोत,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच,
“जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, जे भाजपमधील अस्सल मराठी आहेत आणि ज्यांना सध्याची परिस्थिती मान्य नाही, ते आमच्याकडे येऊ शकतात,”
अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिली
शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे संकेत देत त्यांनी सांगितले की, “आमची युती महाराष्ट्र रक्षणासाठी आहे. कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही लढणार आहोत.”
राजकीय तापमान वाढण्याची शक्यता
मनसे-शिवसेना युतीनंतर मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे बंधू यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत या पत्रकार परिषदेतून मिळाले आहेत.
Users Today : 11