नवी दिल्ली –
भारतीय नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच तीन नव्या विमान कंपन्या दाखल होणार असून केंद्र सरकारने त्यासाठी आवश्यक परवानग्या दिल्या आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी गेल्या आठवड्यात देशातील प्रमुख हवाई वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली होती.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या तीन कंपन्या भारतीय हवाई क्षेत्रात सेवा सुरू करण्यास सज्ज आहेत. यापैकी शंख एअरला यापूर्वीच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यात आले होते. तर, गेल्या आठवड्यात अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या दोन कंपन्यांनाही ना हरकत प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार होत असल्याचे राम मोहन नायडू यांनी नमूद केले. नव्या एअरलाईन्सना प्रोत्साहन देऊन स्पर्धा वाढवण्याचा आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘उडान’ योजनेमुळे स्टार एअर, इंडिया वन एअर, फ्लाय ९१ यांसारख्या छोट्या विमान कंपन्या सुरू झाल्या असून त्या प्रादेशिक संपर्क वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही नायडू यांनी सांगितले.
इंडिगोच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय महत्त्वाचा
नव्या एअरलाईन्सना परवानगी देण्याचा हा निर्णय अलीकडेच इंडिगो एअरलाईनमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनच्या नव्या मार्गदर्शक सूचना योग्य वेळी लागू न केल्याने इंडिगोला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
इंडिगोने सध्या आपली सुमारे ९५ टक्के नेटवर्क कनेक्टिव्हिटी पूर्ववत केल्याचे सांगितले आहे. कंपनीकडून सध्या १००० हून अधिक उड्डाणे सुरू असून १३८ पैकी १३५ मार्गांवर सेवा दिली जात आहे.
दरम्यान, रद्द झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना तातडीने परतावा देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. इंडिगोने प्रवाशांची माफी मागत झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला होता. या प्रकरणी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्र सरकारने चौकशीही केली होती.
एकूणच, तीन नव्या विमान कंपन्यांच्या प्रवेशामुळे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची आणि प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे
Users Today : 32