नवी दिल्ली / वेलिंग्टन :
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण अधिक सक्रिय करत अनेक देशांशी मुक्त व्यापार करार (FTA) केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकताच मुक्त व्यापार करार झाला असून, या करारामुळे जागतिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडमधील एका मंत्र्याने या कराराला तीव्र विरोध दर्शवला असतानाही, पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी भारतासोबतच्या कराराचे ठाम समर्थन करत ऐतिहासिक विधान केले आहे.
अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादल्यानंतर भारताने त्याचा परिणाम कमी करण्यासाठी रशिया, चीनसह विविध देशांशी व्यापार संबंध अधिक दृढ केले. अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लावूनही भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नाही. उलट अनेक देश भारताच्या बाजूने उभे राहिले. भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार चर्चा सुरू असल्या तरी, टॅरिफ १५ टक्क्यांपर्यंत कमी होईपर्यंत कोणताही अंतिम करार होणार नाही, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.
दरम्यान, भारताने न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांनी या कराराला जाहीर विरोध दर्शवला. ‘न्यूझीलंड फर्स्ट’ या भूमिकेचा दाखला देत त्यांनी भारतासोबतच्या करारावर नाराजी व्यक्त केली, त्यामुळे या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मात्र, या विरोधानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी थेट पुढे येत भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराचे जोरदार समर्थन केले. “भारतासोबत मुक्त व्यापार करार होणे हे ऐतिहासिक पाऊल आहे. आम्ही १.४ अब्ज भारतीयांसाठी आमच्या देशाची दारे उघडी केली आहेत. या करारामुळे दोन्ही देशांची आर्थिक क्षमता वाढेल, उत्पन्नात भर पडेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
भारतासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, न्यूझीलंडमुळे भारताला एक मोठी आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या करारातून मोठ्या प्रमाणावर व्यापारवाढ होण्याची शक्यता आहे. कृषी, दुग्धव्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात दोन्ही देशांना याचा थेट लाभ होणार आहे.
दरम्यान, भारत सध्या जागतिक पातळीवर व्यापार भागीदारी अधिक मजबूत करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नुकत्याच झालेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यातही अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले होते. यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक प्रभावी भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Users Today : 8