Heavy Rain Alert | २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; राज्यात थंडीची लाट, काही भागांत गारठा

Khozmaster
2 Min Read

मुंबई :-

महाराष्ट्रासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून, एका बाजूला थंडीची तीव्रता वाढत असताना दुसऱ्या बाजूला देशातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २८, २९, ३० आणि ३१ डिसेंबरदरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसासह थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपूर्वी थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा थंडी वाढली असून, पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीचा कडाका जाणवला असून, काही भागांमध्ये गारठ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, येथे ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. आहिल्यानगरमध्ये ७.३ अंश, परभणी ७.५ अंश, निफाड ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा आणि नाशिक येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील थंडी अधिक तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, मॉन्सून संपून काही महिने उलटूनही देशाच्या काही भागांमध्ये पावसाची मालिका सुरूच आहे. हवामान विभागाने केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागांमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचदरम्यान, मुंबई, दिल्ली आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईत सध्या हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून, अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २०० च्या वर गेला आहे. परिणामी नागरिकांना सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप आणि श्वसनाचे विकार जाणवत आहेत. श्वसनासंबंधित आजार असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे किंवा मास्कचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

वाहनांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणावरील बांधकाम प्रकल्पांमुळे उडणारी धूळ आणि कमी वेगाचे वारे ही मुंबईतील वायू प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जात आहेत. कमी वेगाच्या वाऱ्यांमुळे प्रदूषक शहरातच अडकून राहत असल्याने प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. थंडी, पाऊस आणि प्रदूषण या तिहेरी संकटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

0 9 4 5 4 3
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *