बुलढाणा प्रतिनिधी –
बुलढाणा ः धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव अटळ झाला असून, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी महिलांवर असल्याने त्यांच्यावर मानसिक दबाव अधिक प्रमाणात येतो. त्यामुळे महिलांनी ताण-तणावाचे योग्य नियोजन करण्यासाठी दररोज किमान एक तास तरी स्वतःसाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ डॉ. राहुल शेवाळे यांनी केले.
मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराच्या वतीने २३ जानेवारी रोजी सागवन, गायरान येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. शाहीना पठाण होत्या. तर मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राहुल शेवाळे म्हणाले की, मुलांचे संगोपन, घराची जबाबदारी, कुटुंबाची काळजी ही मुख्यत्वे महिलाच घेत असतात. त्याचबरोबर नोकरी, उद्योग किंवा व्यवसाय असल्यास त्यासाठीही महिलांना वेळ द्यावा लागतो. काही वेळा पती व्यसनी असल्यास त्याचा अतिरिक्त मानसिक ताणही महिलांवर येतो. अशा परिस्थितीत महिलांसाठी ताण-तणावाचे नियोजन अत्यंत आवश्यक असून, स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी किमान एक तास तरी महिलांनी स्वतःसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. डी. एस. लहाने यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडताना सांगितले की, विधवा महिला सक्षमीकरण चळवळीबरोबरच एकूणच महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मानस फाउंडेशन प्रयत्नशील आहे. महिलांच्या समस्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असल्याने यंदाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. शाहीना पठाण यांनी महिलांसाठी आयोजित करण्यात येणारे असे वैचारिक कार्यक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीषा वारे यांनी मानले.
महिलांच्या मानसिक आरोग्याविषयी जागृती करणारा हा कार्यक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला
महिलांनी ताण-तणाव व्यवस्थापनासाठी स्वतःसाठी वेळ द्यावा
0
9
4
9
8
4
Users Today : 15
Leave a comment