लग्नाचे आमिष देऊन नातेसंबंध; ऐनवेळी नकार, २० वर्षीय तरुणीची आत्महत्या

Khozmaster
1 Min Read

चिखली प्रतिनिधी –
लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि नंतर लग्नास स्पष्ट नकार दिल्याने मानसिक धक्का बसून एका २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील केळवद येथे घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
केळवद येथे वास्तव्यास असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील सदर तरुणीचे पाटोदा (ता. चिखली) येथील तनमय विजय गवई याच्याशी प्रेमसंबंध होते. आरोपीने पीडितेला “उन्हाळ्यात आपण लग्न करू,” असे आश्वासन दिले होते. या विश्वासावर दोघांमध्ये नियमित फोनवर संभाषण होत होते तसेच भेटीगाठीही होत असल्याची माहिती समोर आली आहे.
२४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते १०.५३ च्या सुमारास आरोपी तनमय याने तरुणीशी फोनवर संवाद साधला. या संभाषणादरम्यान त्याने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने तरुणी मानसिकदृष्ट्या खचून गेली. त्यानंतर तिने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेनंतर तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली व ऐनवेळी नकार देऊन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

0 9 4 9 8 4
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *