देऊळगाव राजा (प्रतिनिधी)
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त आणि महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांची विशेष उपस्थिती होती.
ध्वजवंदनानंतर एन.सी.सी. कॅडेट्सनी परेड कमांडर एसयूओ सुनिता मेहेत्रे, राइट मार्कर कॅडेट नितेश बच्छिरे, लेफ्ट मार्कर कॅडेट आरिश शेख व फ्लॅग होल्डर कॅडेट अमर तिडके यांच्या नेतृत्वात उत्कृष्ट पथसंचलन केले. या कार्यक्रमात वर्तमान शैक्षणिक सत्रातील उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून सिनियर अंडर ऑफिसर ऋषिकेश दिनकर सांगळे आणि सुनिता शंकर मेहेत्रे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आलें. तसेच आंतरमहाविद्यालयीन थाळी फेक स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्याबद्दल यशोवर्धन सोळंके आणि आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत कलर कोट प्राप्त केल्याबद्दल कु. मोनिका सवडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरेंद्र शिवप्रसाद टापरे या बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा स्पर्धा २०२५-२६ मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गोरे यांना *जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार तसेच महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर शिंब्रे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजे विजयसिंह जाधव आणि सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ध्वजवंदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांनी केले. उद्देशिका वाचन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी केले. पथसंचलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट लक्ष्मी हिरे हिने तर उपस्थितांचे आभार लेफ्टनंट डॉ. महेश तांदळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स, रासेयो स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 14