बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी –
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये काही औषधांचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्या तरी, प्रशासनानुसार ही परिस्थिती तात्पुरती असून येत्या आठवडाभरात औषधपुरवठा पूर्ववत होण्याचे संकेत आहेत.
द्रावण स्वरूपातील तसेच टॅबलेट प्रकारातील काही औषधे सध्या उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयांवर ताण निर्माण झाला आहे. मात्र जिल्ह्यात आवश्यक औषधसाठा प्रत्यक्षात उपलब्ध असून, तपासणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे वितरण केले जाते, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सुमारे १६ ते १७ ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही स्थिती दिसून येत आहे. जिल्हा औषध खरेदी व वितरण व्यवस्थेनुसार, गोदामात उपलब्ध औषधसाठ्याची गुणवत्ता राष्ट्रीय चाचणी व कॅलिब्रेशन प्रयोगशाळा मान्यता मंडळ (एनएबीएल) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासली जाते. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच औषधे रुग्णालयांना वितरित करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे काही वेळा औषधपुरवठ्यात विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षभरापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कथित निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याच्या घटनांनंतर ही तपासणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. वर्धा व मिरज येथील प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, रुग्णांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत राज्यस्तरावर हा निर्णय घेण्यात आला. परिणामी, औषधे उपलब्ध असली तरी तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांचे वितरण थांबवले जाते.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळाल्यानंतर औषध खरेदीसाठी आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. सामान्यतः पुरवठादाराला औषधे वितरित करण्यासाठी किमान ५० दिवसांची मुदत दिली जाते. बुलढाणा जिल्ह्यात काही औषधांचा पुरवठा पूर्ण झाला असून, उर्वरित औषधे येत्या आठवडाभरात उपलब्ध होतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
टॅबलेट व द्रावण स्वरूपातील औषधांचा तुटवडा तात्पुरता असून ही अडचण लवकरच दूर होईल, असा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ग्रामीण रुग्णालयांत काही औषधांचा तात्पुरता तुटवडा आठवडाभरात पुरवठा पूर्ववत होणार; प्रशासनाचा दावा
0
9
4
9
8
3
Users Today : 14
Leave a comment