मुंबई विशेष प्रतिनिधी :
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळणे हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसीटी) गुन्हा ठरतो. त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
नाशिक येथे झालेल्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात मंत्री महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत अॅड. आंबेडकर यांनी तीव्र भूमिका मांडली. “मंत्री महाजन यांचे भाषण कुणी लिहून दिले असेल, तर त्या संबंधित व्यक्तीवरही कारवाई झाली पाहिजे. ही चूक अनवधानाने झाली असल्याचे ते सांगत असतील, तर त्यांचे मंत्रीपदही अनवधानाने काढून घेण्यास हरकत नाही,” असे ते म्हणाले.
भारतीय प्रजासत्ताक संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी झाला, त्या दिवशीच्या कार्यक्रमात संविधाननिर्मात्याचा नामोल्लेख टाळणे हा गंभीर अपराध असल्याचे नमूद करत अॅड. आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवरही आरोप केले. “बाबासाहेबांविषयी संघ आणि भाजपचे प्रेम हे तोंडदेखले असून, त्यांनी सातत्याने बाबासाहेब व त्यांच्या विचारांचा विरोध केला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीची नाशिक पश्चिम समिती मंत्री महाजन यांच्याविरोधात अॅट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, तर स्वतः कायदेशीर मसुदा तयार करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री महाजन यांच्या विरोधात राज्यभर सुरू असलेली आंदोलने ही आंबेडकरी समाजातून उमटलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंत्री महाजन यांच्या वर्तनाविरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्या वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुकही त्यांनी केले.
भाजपची जातीयवादी मानसिकता उघड – वर्षा गायकवाड
प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव आहे. त्या दिवशी संविधानाच्या निर्मात्यांना विसरणे ही भाजपची महाराष्ट्रविरोधी आणि जातीयवादी मानसिकता दर्शवते, असा आरोप काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
भाजप कायम मनुवादी – विजय वडेट्टीवार
एका बाजूला आणीबाणीविरोधात तुरुंगात गेलेल्यांचा सन्मान केला जातो, तर दुसऱ्या बाजूला संविधाननिर्मात्यांचा अपमान केला जातो. भाजप कायम मनुवादी राहिली असून, या प्रकरणातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, असे विधान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
‘जोडे मारा’ आंदोलन आणि समाजमाध्यमांवर टीका
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याबाबत वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणावरून समाजमाध्यमांवर त्यांच्यावर तीव्र टीका होत असून विविध ठिकाणी ‘जोडे मारा’ आंदोलनही करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळणे अॅट्रॉसीटीचा गुन्हा; गिरीश महाजन यांच्यावर कारवाईची मागणी
0
9
4
9
8
4
Users Today : 15
Leave a comment